आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी…. आषाढी एकादशी ही दोन सर्वात मोठ्या एकादशिंपैकी एक आहे.
आषाढ महिन्यातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी, महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून आषाढी एकादशीला ओळखले जाते.
“तुका म्हणे एक विठ्ठलची खरा । येर तो पसारा । वाउगाची ।। “
आषाढी एकादशीचा दिवस हा महाराष्ट्रात आणि कर्नाटकात उत्साहाने साजरा केला जातो. आषाढी एकादशी चा दिवस महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी बव राज्याच्या कानकोपऱ्यांतून भाविक येतात, आणि दर्शनाचा लाभ घेतात. त्या दिवशी दर्शनासाठी लांबच या रांग असते. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचा तीर माणसांनी/भाविकांनी फुलून गेलेला असतो. त्या सावळ्या परब्रम्ह च्या दर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीला पंढरपुरातील रस्तेही अपुरे पडतात. टाळ मृदुंगाच्या तालावर धुंद होऊन गिरकी घेणारे वारकरी, डोईवरच्या तुळशीशी हितगुज करणाऱ्या माता भगिनी, जातीपातीच्या पलीकडे जाऊन भगवंताशी द्वैत साधलेल्या दिंड्या , संतांच्या पादुका मिरवणारे भक्तजन असे सारेच विठू माउलीच्या दर्शनासाठी अतुर झालेले असतात.
“टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग । देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग ।। “
वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राचे व्यावच्छेदक लक्षण. कोणीही कसलेही आमंत्रण न देता वर्षानुवर्षे वारकरी जमतात आणि आपल्या खांद्यावर संतांच्या पालख्या मिरवत, मिरवत विठूमाऊलीचे नामस्मरण करत पंढरपूर ला जातात. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही अखंडित परंपरा. या वारीचा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अभ्यास चालू आहे. एक कुटुंब म्हणून वारकरी प्रवास करत असतात. नामस्मरण, कीर्तन, भजन असा आध्यात्मिक आनंद लुटत पावले पंढरीची वाट जवळ करीत असतात.
” पंढरीस जाय । तो विसरे मायबाप ।। अवघी होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ।। न लगे धन मान । देहभावे उदासीन ।। तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ।। ”
वारी शहरातून जाताना शहरवासी किंवा सार्वनिक मंडळे दरवर्षी वारकऱ्यांना उपयोगी वस्तूंचा पुरवठा करत वारकऱ्यांची म्हणजेच विठुरायाची सेवा करत असतात. आषाढी एकादशीला वारकरी पवित्र अशा चंद्रभागेत स्नान करत सुर्यदेवतेला नमन करून विठ्ठलाच्या पवित्र दर्शनाला जातात. उपवास करतात. आणि परत भक्तिभावाने परतीच्या वाटेवर निघतात.
“ओवी आणि अभंग ने भुई सारी भिजे । पालखीच्या आज मन माझे नाचे, मन माझे नाचे । टाळ मृदुंगाचा घोष, पताकाची दाटी । विठ्ठलाच्या भेटी जाती, आज त्यांच्या भेटी ।।”
कोरोनामुळे वारी निघणार तर नव्हतीच पण संतांच्या पालख्या बस सेवेने पंढरपूरला रवाना झाल्या. “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल” असे संत एकनाथ महाराज म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला पालखी सोहळा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी जर साऱ्या गोष्टी पाळत असेल, तर आपल्यालही ते पाळता यायला हवे.
सर्वांनी घरी सुरक्षित रहा, नियमांचे काटेकोर पालन करा, स्वतः लाही आणि इतरांना जपा, काळजी घ्या. “विठू माउली तू माउली जगाची । माउलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा।।”
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय”.
“जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”