कुठंतरी शेवटच्या मजल्यावर अडकून पडलो आहे मी. लिफ्ट बंद आहे आणि उतरण्यासाठीचे जिने गायब झालेत अचानक. मी घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन शोधत राहतो खाली जाणारा जिना तर दिसते प्रचंड खोल पोकळी आणि गडद अंधार. मी परततो घरात. तिथं उजेड असतो केवळ माझ्यापुरता मी शोधत राहतो त्यात माणसांना. तर दिसत नाही कोणीच आजूबाजूला. मी उभी राहातो तासंतास आरशासमोर सोबतीला आपण आहोत आपल्या याचा दिलासा वाटत राहातो आतल्या आत. मी काढतो कोनाड्यातले सगळे पुस्तके आणि पुसून जपून ठेवतो हृदयाशी. पुस्तकांच्या कपाटातली माणसं सांगत राहातात गोष्टी प्रेमाच्या, त्यागाच्या, कटकारस्थानांच्या आणि निरर्थकतेच्या. “‘मरण अटळ आहे’ तेव्हाच सांगितलं होतं मी तुला,’ असं हसत म्हणतो कामू आणि ‘प्लेग’ ची पानं फडफडवत राहातो माझ्यासमोर. एक साथ कशी दूर करू शकते अनेक साथीदारांना याच्या कहाण्या उलगडत जातो तो इतिहासातले दाखले देत तेव्हा उमळून येतं आतून. लोक रडत राहातात भीषण व्हिडिओमधून, ऑडिओमधून कोणकोणत्या भाषांत बोलत असतात ते सांगत राहातात माणसांची साथ सोडण्याचे आणि स्वतःला कायमचं एकटं करण्याचे फायदे मृत्यूविषयीचं एकच वाक्य उच्चारत असतात पुन्हा पुन्हा आणि कोणालाच कळत नाही नेमकं काय बोलताहेत ते.
मृत्यूला कवटाळण्यासाठी
कित्येकदा उभा राहिलो होतो मी
आत्महत्येच्या टोकावर……
. सहज खेळायचे लपंडाव त्याच्याशी. मित्रच होता तो माझा तसा जुना जाणता. मग आज का आलाय तो असा वैऱ्यासारखा एकटेपणाचं भयाण गाणं गात.
इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर उभा आहे मी. वाटा अदृश्य झाल्यात अचानक कुठल्याही उतारावरून उतरण्याच्या. आणि मला कळत नाही कोणत्या बिंदूतून सुरु झालं होतं माझं आय़ुष्य आणि कुठल्या बिंदूवर संपणार आहे ते नेमकं.